- लाखोंचा मुद्देमाल जप्त ; चार जणांवर गुन्हे दाखल
बेळगाव : बेळगाव शहरात अंमली पदार्थांची विक्री आणि अवैध जुगाराविरोधात मार्केट व शहापूर पोलिसांनी संयुक्तपणे धडक कारवाई केली असून या मोहिमेत हेरॉईनसह रोख रक्कम व अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
खंजर गल्ली परिसरात हेरॉईनची विक्री करत असल्याच्या माहितीवरून मार्केट पोलिसांनी अर्बाज नागानूर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४.१ ग्रॅम हेरॉईन आणि एक स्कूटर जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान, शहापूर पोलिसांनी मलप्रभा नगर आणि येडियुरप्पा मार्गावरील मटका अड्ड्यांवर छापा टाकून संजय धनदवर आणि महेश गंदिगवाड यांना ताब्यात घेतले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली असून अवैध जुगार चालवणाऱ्या नेटवर्कचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
अंमली पदार्थ पुरवठादार तबीज सामरी आणि मटका एजंट अभय पाटील यांच्यासह संबंधितांवर कठोर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईचे पोलीस आयुक्तांनी कौतुक केले असून अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.








