बेळगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती काही दिवसांवर आली असून शहरात विविध ठिकाणी तयारीला वेग आला आहे. मात्र कसाई गल्ली परिसरातील रस्ते आणि स्वच्छतेची दयनीय अवस्था पाहता प्रशासनाच्या उदासीनतेवर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
भीमज्योती मिरवणूक कसाई गल्ली मार्गावरून जाणार आहे. या पार्श्वभूमीवर रस्ते दुरुस्ती, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांची कामे १३ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांच्या बैठकीत देण्यात आले होते. मात्र जयंतीला अवघे काही दिवस उरले असतानाही प्रत्यक्षात कोणतीही कामे सुरू न झाल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.

कसाई गल्ली परिसरात गटारींचे काँक्रीटीकरण नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचून दुर्गंधी पसरली आहे. रस्त्यांवरील डांबर उखडल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले असून स्वच्छता यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
स्वच्छतेअभावी साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली असल्याचे स्थानिक बाबू पुजारी यांनी सांगितले. दरम्यान, भीमज्योती मिरवणुकीचा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने खड्डेमय रस्ते आणि साचलेले सांडपाणी यामुळे मिरवणुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तातडीने स्वच्छता व दुरुस्तीची कामे सुरू करावीत, अन्यथा जयंतीच्या दिवशी अस्वच्छ परिस्थितीत मिरवणूक काढावी लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.








