- हिरेबागेवाडी, खडेबाजार, काकती आणि माळमारुती पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई
बेळगाव : बेळगाव शहरात पोलिसांनी अवैध कृत्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. एकीकडे त्यांनी परवान्याशिवाय दारू विकणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली, तर दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करून गैरवर्तन करणाऱ्या तरुणांवर कारवाई केली आहे.
बेळगाव शहरातील हिरेबागेवाडी, खडेबाजार, काकती आणि माळमारुती पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी अवैध व्यवसायांवर छापे टाकले आहेत. हिरेबागेवाडीचे पीएसआय अविनाश ए. वाय. आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी रेणुका पेट्रोल पंपाजवळ कारवाई करत के. के. कोप्पड येथील राजू बसप्पा बसन्नवर याला अवैध दारू विक्री केल्याबद्दल अटक केली. त्याच्याकडून सुमारे ३६,१४० रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे व्हिस्कीचे सॅशे आणि एक हीरो पॅशन प्रो बाईक जप्त करण्यात आली. उत्पादन शुल्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरीकडे, अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहीमेत पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करून त्रास देणाऱ्या चार जणांना तुरुंगात टाकले आहे.खडेबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सरदार मैदानाजवळ कृतिक संजय बडीगा याला एएसआय बी. आय. पाटील यांच्या पथकाने अटक केली.
काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबेवाडी येथे पीएसआय मृत्युंजय मठ यांच्या नेतृत्वाखाली श्रीनाथ रामचंद्र आंबेकर आणि सागर देवराज आंबेकर यांना ताब्यात घेतले. माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत न्यू गांधी नगर येथे गांजाच्या अंमलाखाली असलेल्या प्रणीत ईश्वर पुजारी याला वैद्यकीय तपासणीनंतर पीएसआय होनप्पा तळवार यांच्या पथकाने अटक केली.
बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी आपल्या कर्तव्यात कार्यक्षमतेने काम करणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.








