- जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन
बेळगाव / प्रतिनिधी
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना बेळगाव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याबाबत कोणतीही मोठी अडचण उद्भवू नये यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध उपाययोजना केल्या आहेत. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जलस्रोतांच्या पातळीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून नागरिक आणि पशुधनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली.
आज बेळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सुमारे ५०० ग्रामपंचायतींमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची कमतरता नाही. यासाठी पूर्वीच बैठक घेऊन आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. मात्र, सुमारे १२६ गावांमध्ये भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचे उपाय राबवण्यात येत आहेत.
संबंधित ग्रामपंचायतींना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली टँकरची व्यवस्था करण्यात आली असून काही ठिकाणी खाजगी बोअरवेलही सुरू करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील जलाशयांतील पाणीपातळीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
शहरी भागात पाणीपुरवठ्यासाठी खाजगी टँकरचा वापर वाढवण्यात आला असून, या टँकर चालकांकडून जादा दर आकारले गेल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.








