• वरेरकर नाट्य संघही घेणार सहभाग
  • बालनाट्य ठरणार खास आकर्षण

बेळगाव : बुलकच्या या आठवड्यातील कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, तो उद्या शुक्रवार ऐवजी, शनिवार दि. ४ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी वरेरकर नाट्य संघाच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत येणार असून तो अधिक आकर्षक ठरणार आहे. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त दि.२७ मार्चपासून सुरू झालेल्या आठ दिवसीय नाट्य प्रशिक्षण शिबिराची सांगता याच कार्यक्रमात होणार आहे.

प्रसिद्ध नाट्यकर्मी नीता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेल्या बालगोपाळांकडून त्यांच्या अभिनयकलेचे सादरीकरण होणार असून, हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.

यानंतर आसावरी भोकरे यांचे “नाटकाची कुळकथा” हे विशेष कथन सादर होईल. तसेच प्रिया काळे, चिन्मय शेंडे, श्रेया सव्वाशेरी, जगदीश कुंटे आणि आसावरी भोकरे हे कलाकार विविध नाट्याविष्कार सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवणार आहेत.

सदर कार्यक्रम संध्याकाळी ६ ते ७.३० या वेळेत होणार असून, तो सर्वांसाठी खुला आहे. रसिकांनी मित्र-परिवारासह उपस्थित राहून या नाट्यमय सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.