बेळगाव : मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम आता बेळगावमधील ऑटोचालकांवर जाणवत आहे. शहरातील अनेक सीएनजी पंपांवर गॅस संपल्याने चालकांना आपली ऑटो रस्त्यावर ढकलून स्टेशनपर्यंत नेण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. काही चालक तासंतास लांब रांगेत उभे राहूनही सीएनजी मिळवू शकलेले नाहीत, त्यामुळे ते युद्ध लवकर संपवावे आणि सामान्य नागरिकांची सोय होऊ देण्यात यावी अशी प्रार्थना करत आहेत.

इराण-इस्रायल युद्धामुळे सीएनजीचा पुरवठा विस्कळीत झाला असून, त्यामुळे ऑटो रिक्षा चालकांना रस्त्यावरच उतरावे लागत आहे. प्रवासी नसल्याने आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या चालकांसाठी गॅसची टंचाई आता मोठा डोकेदुखी बनली आहे. शहरातील बहुतेक सीएनजी पंपांवर ‘स्टॉक नाही’ असे फलक दिसत असून, काही ठिकाणी गॅसचे दरही दुप्पट आकारले जात असल्याचा आरोप केला जात आहे.

मोफत बससेवेमुळे आधीच त्रस्त असलेले ऑटोचालक आता या तुटवड्यामुळे अधिक त्रस्त झाले आहेत. शहरातील फक्त एका पंपावर सीएनजी उपलब्ध असल्याने, इतर ठिकाणाहून ऑटो ढकलून आणावे लागते. काही ठिकाणी गॅस न मिळाल्यामुळे वाहन बंद पडले असल्याची तक्रारही केली जात आहे.

भाजीमार्केटमधून भाजीपाला घेऊन जात असताना कोल्हापूर सर्कलजवळ ऑटोमध्ये गॅस संपल्याने चालकांना रिक्षा ओढावी लागली. दिवसभर पुरेशी सीएनजी न मिळाल्यामुळे त्यांच्या जीवनात मोठी अडचण निर्माण झाली आहे.

शहरातील चार सीएनजी पंपांवर गॅस संपलेला असून, फक्त आरटीओ सर्कलजवळील ‘गो गॅस’ पंपावर उपलब्ध आहे. ऑटो रिक्षा बंद पडल्यास चालक आणि त्यांच्या कुटुंबांवर परिणाम होईल, असे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणतात की, संबंधित मंत्र्यांनी व आमदारांनी ही समस्या शासनासमोर मांडून त्वरित निराकरण करावे.

एकंदरीत मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम बेळगावच्या नागरिकांवरही जाणवत असून, युद्ध लवकर संपावे, शांतता प्रस्थापित होऊन नागरिकांचे जीवन सुरळीत व्हावे, ही सर्वांची अपेक्षा आहे.