बेळगाव / प्रतिनिधी

आधार एज्युकेशन सोसायटी संचालित आधार पब्लिक स्कूल मध्ये आगळावेगळा ग्रॅज्युएशन डे साजरा झाला. यामध्ये बालचमुने पदवीचा स्वीकार करून आपल्या उज्वल भवितव्यासाठी आशीर्वाद घेतले. आधार शिक्षण संस्थेच्या सह्याद्री नगर येथील मुख्य कार्यालयात हा कार्यक्रम झाला. शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. पूजा बामणे तसेच संचालक डॉ. रोहित बामणे उपस्थित होते. त्यांनी छोट्या विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. अरुण जाधव उपस्थित होते. त्यांनी देखील विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या.

यावेळी शाळेच्या प्राचार्या गीता पासलकर यांनी शाळेच्या प्रगती बद्दल माहिती दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थी वर्गाने शानदार संचलन करीत सभागृहात प्रवेश केला.कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमामध्ये पालक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. कार्यक्रम संयोजनासाठी शाळेतील समस्त शिक्षक आणि कर्मचारीवर्गाने परिश्रम घेतले.