हिंडलगा / वार्ताहर

मण्णूर गावातील स्मशानभूमी गावापासून दीड किलोमीटर दूर असून, अलीकडे अंतिम यात्रा करताना प्रेत खांदावर नेताना लोकांची संख्या कमी होत असल्याने समस्या निर्माण झाली होती. याचा विचार करून जय जन कल्याण सौहार्द संघ आणि जय जन कल्याण सामाजिक व शैक्षणिक फाउंडेशन यांनी गावासाठी शवरथ वाहन तयार करून गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर प्रदान करण्याचा कार्यक्रम रविवारी, 22 तारखेला सकाळी 9 वाजता उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक एल. के. कालकुंद्री उपस्थित होते. शवरथ वाहन प्रदान करण्यासाठी संस्थेचे चेअरमन लक्ष्मण मंडोळकर, व्हाईस चेअरमन संदीप कदम, संचालक ज्योतिबा शहापूरकर, विनायक कालकुंद्री, सागर डोणकरी, संतोष केंचन्नवर, भरमा आनंदाचे, कल्लाप्पा तोरे, बसवंत नाईक, ब्रिजेश देवरमनी, सुधा बाळेकुंद्री, कविता सांबरेकर उपस्थित होते.

प्रारंभी संस्थापक एल. के. कालकुंद्री यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक मनोगत व्यवस्थापक महेश काकतकर यांनी करून उपस्थितांचा परिचय करून दिला. नंतर शवरथ वाहनाचे पूजन संस्थापक एल. के. कालकुंद्री, चेअरमन लक्ष्मण मंडोळकर आणि व्हाईस चेअरमन संदीप कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

हा शवरथ वाहन गावासाठी देवस्की पंच अध्यक्ष मुकुंद तरळे, पंच मारुती चौगुले, अण्णाप्पा चौगुले, मारुती मंडोळकर, शिवाजी कालकुंद्री, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष डी.आर. शहापूरकर यांच्याकडे संस्थेच्या वतीने प्रदान करण्यात आला. संस्थापक एल. के. कालकुंद्री यांनी भाषणात या शवरथ वाहन देण्यामागचा उद्देश स्पष्ट केला.

कार्यक्रमाचे आभार आणि सूत्रसंचालन प्रकाश बेळगुंदकर यांनी केले. यावेळी संस्थेचे सल्लागार परशराम कदम, शितल चौगुले, लता कडोलकर, जयवंत मंडोळकर, नारायण कालकुंद्री, रामा चौगुले, रेणुका डोणकरी, सुनील जानाई, दत्तू चौगुले, तानाजी तरळे, मारुती बेन्नाळकर, सिद्राय बाळेकुंद्री आणि गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या उपक्रमामुळे मण्णूर गावातील जनता समाधानी असून संस्थेच्या या सामाजिक सेवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.