- बीएलओ ॲपद्वारे नावे नोंदविण्याचे आवाहन
बेळगाव / प्रतिनिधी
भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार मतदार यादी सुधारण्यासाठी एसआयआर (SIR) प्रक्रिया बेळगावमध्ये सुरू झाली आहे. बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे नोडल अधिकारी डॉ. सिद्दू हुल्लोळी यांनी नागरिकांना आपली नावे बीएलओ (BLO) ॲपमध्ये नोंदविण्याचे आवाहन केले आहे.
डॉ. हुल्लोळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, फक्त भारतीय नागरिकच मतदान करू शकतील याची खात्री करण्यासाठी दर २० वर्षांनी एसआयआर सर्वेक्षण केले जाते. यामध्ये प्रत्येक मतदाराने आपापल्या भागातील बीएलओंशी संपर्क साधून नावे नकाशावर नोंदवणे अनिवार्य आहे. विशेषतः जे मतदार २००२ नंतर यादीत सामील झाले आहेत, त्यांना या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे.
ही प्रक्रिया येत्या महिन्यात अधिकृतपणे सुरू होण्याची शक्यता आहे. मतदारांनी आपल्याकडील मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांकडे जाऊन बीएलओ ॲपद्वारे आपले ‘मॅप’, ‘प्रोजेनी’ आणि ‘सेल्स प्रोजेनी’ तपशील अद्ययावत करावेत. २००२ पूर्वीपासून यादीत असलेले मतदार, ज्यांनी एसआयआर प्रक्रिया पूर्ण केली आहे, ते थेट मॅपिंग करू शकतात. डॉ. हुल्लोळी यांनी नागरिकांना सांगितले की, ही तांत्रिक प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण करून आपला मतदानाचा हक्क सुरक्षित करावा.








