- मटका बुकीसह चौघांना अटक
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या मच्छे व पिरनवाडी परिसरात पोलिसांनी धडक कारवाई करत मटका जुगार आणि गांजा सेवन करणाऱ्या चार आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई बेळगाव शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दि. १६ मार्च रोजी मच्छे औद्योगिक परिसरातील सार्वजनिक ठिकाणी मटका जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संतोष दळवाई आणि त्यांच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यामध्ये विनायक बाळाराम पाटील आणि रामप्पा चौगला यांना ताब्यात घेतले गेले, त्यांच्याकडून जुगार साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. याप्रकरणी कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.
याचप्रमाणे, मच्छे गावातील सार्वजनिक ठिकाणी अस्वाभाविक वर्तन करणाऱ्या रोहित बसवराज मुतगेकर (रा. पिरनवाडी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक लक्कप्पा जोडट्टी आणि त्यांच्या पथकाने संशयावरून त्याची चौकशी केली असता त्याने अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे उघड झाले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशाच प्रकारे, पिरनवाडी येथील प्रकाश निरुपादी जकबाळ हा तरुणही मच्छे परिसरात गांजा सेवन करून फिरताना आढळल्याने पीएसआय संतोष दळवाई यांनी त्याला अटक केली. या तिन्ही प्रकरणांतील चारही आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून बेळगाव ग्रामीण पोलिसांच्या या तत्परतेबद्दल पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.








