बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी संतोष पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्या अनुभव आणि संघटन कौशल्यावर विश्वास ठेवत ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे. या निर्णयामुळे महापालिकेतील राजकीय हालचालींना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गटनेते म्हणून पेडणेकर यांच्यावर सत्ताधारी नगरसेवकांमध्ये समन्वय राखणे, सभागृहातील भूमिका प्रभावीपणे मांडणे आणि विकासकामांना गती देणे या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असणार आहेत. महापालिकेतील कामकाज अधिक शिस्तबद्ध आणि परिणामकारक करण्यासाठी त्यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे मानले जात आहे.
नियुक्तीची घोषणा होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पेडणेकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. आगामी काळात शहराच्या विकासासाठी ठोस निर्णय घेत सत्ताधारी गट अधिक मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








