- निवडणूक प्रक्रिया, मतदार यादी आणि आर्थिक विषयांवर होणार सविस्तर चर्चा
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव बार असोसिएशनची सर्वसाधारण सभा येत्या मंगळवार, २४ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजता न्यू कोर्ट कॉम्प्लेक्स येथील ॲडव्होकेट समुदाय भवनाच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला सर्व वकील सदस्यांनी केएसबीसी अथवा बार असोसिएशनने जारी केलेले ओळखपत्र सोबत घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या सभेत २०२६ ते २०२८ या कालावधीसाठीच्या व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होऊन निवडणुकीची घोषणा व कार्यक्रमपत्रिका निश्चित केली जाणार आहे. तसेच तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेल्या मतदार यादीवर चर्चा करून ती अंतिम करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. यासोबतच २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी हिशेबांची तपासणी करण्यासाठी सनदी लेखापालाची नियुक्ती करण्याचाही विषय चर्चेला ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, ३११ सदस्यांनी सादर केलेल्या विनंतीनुसार वयोमर्यादा आणि वार्षिक वर्गणीसंदर्भातील सुधारित उपविधींचा आढावा घेण्याबाबतही विचारविनिमय होणार आहे. तसेच २५ वर्षांचा वकिलीचा अनुभव पूर्ण केलेल्या इच्छुक सदस्यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम करण्यासाठी २० मार्चपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सरचिटणीस ॲड. वाय. के. दिवटे यांनी केले आहे.








