बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावमधील शाहूनगर परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला शेवटच्या क्षणी न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे माघार घ्यावी लागली. अनधिकृत इमारत पाडण्यासाठी सुरू केलेली कारवाई अर्धवट थांबवावी लागल्याने अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. या घडामोडींमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

सदर इमारत गेल्या पाच वर्षांपासून कायदेशीर वादात अडकली होती. महापालिकेच्या मते, या बांधकामाने नियोजित ८० फूट रुंदीच्या रस्त्यावर अतिक्रमण केले होते. याबाबत न्यायालयाने अलीकडेच महापालिकेच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर अधिकारी बुलडोझर आणि पथकासह घटनास्थळी दाखल झाले. कारवाईदरम्यान इमारतीच्या मालक आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वादही झाला. संबंधित कुटुंबीयांनी मात्र आपण ६० फूट रस्त्यासाठी आवश्यक जागा सोडूनच बांधकाम केल्याचा दावा केला.
दरम्यान, पाडकाम सुरू असतानाच मालकांच्या वकिलांनी घटनास्थळी येऊन न्यायालयाकडून मिळालेल्या स्थगिती आदेशाची प्रत सादर केली. त्यामुळे कायदेशीर अडचण निर्माण झाल्याने महापालिकेला कारवाई थांबवावी लागली. या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पुढील आदेशाची प्रतीक्षा सुरू आहे.








