बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव महापालिकेतील महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज, बुधवार रोजी निवडणूक होत असून शहराचे नवे नेतृत्व निश्चित होणार आहे. विद्यमान महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी जोशी यांचा कार्यकाळ नुकताच संपल्याने या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. निवडणुकीसाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून प्रादेशिक आयुक्त जानकी के. एम. यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे.
या निवडणुकीत एकूण ६५ मतदारांना मतदानाचा अधिकार आहे. यामध्ये ५८ लोकनियुक्त नगरसेवक, ४ आमदार, ४ खासदार आणि १ विधानपरिषद सदस्य यांचा समावेश आहे. महापालिकेत स्पष्ट बहुमत भाजपकडे असल्याने महापौर आणि उपमहापौर ही दोन्ही पदे भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, पक्षांतर्गत समीकरणांमुळे नेमकी कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता कायम आहे.
यंदा महापौरपद सामान्य महिला प्रवर्गासाठी तर उपमहापौरपद सामान्य प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये चुरस वाढली असून राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. निवडणुकीनंतर महापालिकेच्या सत्तेचे नवे समीकरण स्पष्ट होणार असून शहराच्या विकासाच्या दृष्टीने पुढील वाटचाल कशी असेल, याकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे.








