- मार्केट पोलिसांची कारवाई
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरातील शेट्टी गल्ली परिसरात सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थांचे सेवन करून असामान्य वर्तन करणाऱ्या एका तरुणाला मार्केट पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेट्टी गल्ली परिसरात एका तरुणाने रस्त्यावर संशयास्पद हालचाली करत असभ्य वर्तन केल्याची माहिती मिळाल्यानंतर मार्केट पोलिस स्थानकाचे पीएसआय विठ्ठल हवन्नावर आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. यावेळी सुजल कृष्णनाथ पाटील (वय १९) या तरुणाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान तसेच वैद्यकीय तपासणीत त्याने गांजासारख्या अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेप्रकरणी मार्केट पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५१/२०२६ नोंदवण्यात आला असून एनडीपीएस कायद्याच्या कलम २७ (ब) अंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थांचे सेवन करून गोंधळ निर्माण करणाऱ्या आरोपीवर तातडीने कारवाई केल्याबद्दल बेळगाव शहर पोलिस आयुक्त आणि उपायुक्त यांनी पीएसआय विठ्ठल हवन्नावर तसेच त्यांच्या पथकाचे कौतुक केले आहे.








