
- मृणाल हेब्बाळकर यांच्याहस्ते भूमिपूजन
- गावाच्या पायाभूत सुविधांना चालना
सुळगा (हिं.) / प्रतिनिधी
सुळगा (हिं.) गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या विविध रस्ते बांधकामाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. गावातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या उद्देशाने आयोजित भूमिपूजन सोहळा मा. मृणाल हेब्बाळकर यांच्याहस्ते संपन्न झाला. या उपक्रमामुळे गावातील नागरिकांना सुकर वाहतूक व्यवस्था उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या अंतर्गत गावातील मिलकी रोड, शंकर मंदिर मागील परिसर, आंबेडकर गल्ली, सिमेदेव नगर तसेच साई कॉलनी या भागांमध्ये रस्ते बांधकामाच्या कामांना अधिकृतपणे प्रारंभ करण्यात आला. या रस्त्यांमुळे दैनंदिन वाहतूक अधिक सुलभ आणि सुरळीत होणार असून गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

भूमिपूजन कार्यक्रमावेळी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, गावातील देवस्की पंच, मान्यवर नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात सुरू झालेल्या या विकासकामांमुळे स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून गावाच्या प्रगतीसाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.








