- जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त विशेष व्याख्यान आणि महिलांचा सत्कार
बेळगाव / प्रतिनिधी
स्त्रीशिक्षण, स्त्रीसमानता आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श आजही समाजाला दिशा देणारा आहे. शिक्षण, विज्ञान, समाजसुधारणा आणि नेतृत्वाच्या क्षेत्रात महिलांनी दिलेले योगदान पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे, असे प्रतिपादन समाजसेवक व माजी नगरसेवक अनिल पाटील यांनी केले.
जागतिक महिला दिन आणि सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यान कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. विश्वभारत जनकल्याण सामाजिक संस्था, रत्नअर्जुन फाउंडेशन पुणे, जे.के. फाउंडेशन बेळगाव, दीपज्योती फाउंडेशन बेळगाव, अखिल भारतीय प्रगतिशील एल्गार सामाजिक साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्था, विश्वभारत सेवा समिती संचलित मंथन मराठी साहित्य संघ तसेच बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समिती संचलित मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेज टिळकवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीर संभाजी चौक येथील श्री शंभू जत्तीमठ येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल पाटील होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रोपट्याला पाणी घालून आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. या वेळी महिला सक्षमीकरण, शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर शिवाजी मेलगे, प्रतीक धामणेकर, श्रीधर पाटील, एस. एस. पाटील, उदय पाटील, प्रकाश नंदीहळी, प्रा. विशाल करंबळकर, प्रा. निलेश शिंदे, प्रा. आर. एम. मोहिते, प्रा. मेघा खन्नूकर, भाग्यश्री पाटील, बाळकृष्ण धामणेकर, विजय देसाई, डॉ. गजानन वरपे, मारुती बेडीगेर, अमोल सुतार, विशाल पाटील, यलाप्पा पाटील, सागर गुंजीकर, सुधीर लोहार, प्रा. एन. जी. पाटील, प्रा. महादेव नार्वेकर, समीर बाळेकुंद्री, एन. एस. हवालदार आणि एन. डी. गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.
- विविध क्षेत्रांतील महिलांचा सत्कार
जागतिक महिला दिन आणि सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. समाजसेविका निर्मला वीरभद्र उचगावकर, अखिल भारतीय जिल्हा महिला परिषद कर्नाटक प्रदेशाध्यक्ष माधुरी मधुकर नेवगिरी, सुमती हरीश पुजारी, वर्षा ज्योतीनाथ चौगुले, विद्या अनिल गिरी, साधना कमलाकर पाटील, साधना शिवाजी मेलगे, प्रियंका शंकर जेलुगडेकर आणि लक्ष्मी बाळकृष्ण धामणेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
अनिल पाटील पुढे म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांनी समाजातील तीव्र विरोधाला तोंड देत मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यांच्या क्रांतिकारी कार्यामुळे आज स्त्रिया शिक्षण, प्रशासन, विज्ञान, साहित्य आणि विविध क्षेत्रांत मोठी प्रगती करत आहेत. धैर्य, जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर जगभरातील अनेक महिलांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या संघर्षमय प्रवासातून समाजाला समानता, स्वाभिमान आणि प्रगतीचा मार्ग मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिलांनी शिक्षण, स्वावलंबन आणि सामाजिक जागृतीच्या माध्यमातून समाजपरिवर्तनात सक्रिय भूमिका बजावावी, असेही त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाचे स्वागत प्रा. मयुर नागेनहट्टी यांनी केले, तर प्रास्ताविक प्रा. शशिकांत धामणेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. निलेश शिंदे यांनी केले आणि आभार अनिल गिरी यांनी मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, महिला, युवक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







