बेळगाव / प्रतिनिधी

हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृह परिसरात पुन्हा मोबाईल फोन आणि सीमकार्ड आढळून आल्याने कारागृह प्रशासनाची धावपळ उडाली आहे. कारागृहातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी दरम्यान दोन मोबाईल फोन आणि एक सीमकार्ड सापडले असून याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

अलीकडेच कारागृह प्रशासनाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी कारागृहाला भेट देत गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार, दि. १० रोजी सकाळी कारागृह प्रशासनाने सर्कल क्रमांक दोनमधील बराक क्रमांक चार येथे तपासणी मोहीम राबवली.

यावेळी शौचालयाच्या खिडकीत एक सीमकार्ड आणि कीपॅड मोबाईल आढळून आला. तसेच भिंतीत लपवून ठेवलेल्या प्लास्टिक पिशवीत आणखी एक मोबाईल फोन सापडला. संबंधित मोबाईल आणि सीमकार्ड अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहेत.

या प्रकरणी कारागृह प्रशासनाच्या वतीने जेलर रमेश कांबळे यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.