बेळगाव / प्रतिनिधी

वडगावमधील रयत गल्ली परिसरात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये सांडपाणी मिसळत असल्याच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी महापालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढून जोरदार आंदोलन केले. प्रशासनाकडून वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी रिकाम्या घागरी फोडून संताप व्यक्त केला.

रयत गल्ली परिसरातील रहिवासी गेल्या १५ ते २० दिवसांपासून दूषित पाणीपुरवठ्याच्या समस्येला तोंड देत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये सांडपाणी मिसळत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून याबाबत महापालिकेला अनेकदा निवेदने देण्यात आली होती. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त नागरिकांनी थेट महापालिका कार्यालय गाठून आंदोलन छेडले.

दरम्यान काही आंदोलकांनी महापालिका कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी संतप्त नागरिकांनी कार्यालयाच्या आवारात रिकाम्या घागरी फोडून प्रशासनाच्या दिरंगाईचा निषेध नोंदवला.

पाणीपुरवठा दूषित झाल्यामुळे नागरिकांना तसेच पाळीव प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेचे पाणी येत नसल्यामुळे खासगी टँकरसाठी ८०० रुपये खर्च करावे लागत असल्याची व्यथा आंदोलक महिलांनी मांडली. समस्या तातडीने न सोडवल्यास संपूर्ण वडगावमधील नागरिक महापालिकेला घेराव घालतील, असा इशारा राजू मरवे यांनी दिला.

घटनेची माहिती मिळताच मार्केट पोलीस ठाण्याचे निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व उपनिरीक्षक विठ्ठल हावन्नवर यांनी घटनास्थळी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर महापालिका आयुक्त कार्तिक एम. तसेच अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांनी नागरिकांचे निवेदन स्वीकारले.

दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन प्रशासनाकडून मिळाल्यानंतर नागरिकांनी अखेर आपले आंदोलन मागे घेतले.