- नगरसेवक नितीन जाधव यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावातील हिंदवाडी परिसरात भूमिगत गॅस पाईपलाईनला धक्का लागून गळती झाल्याची घटना घडली. गॅसचा तीव्र वास पसरल्याने नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली; मात्र वेळीच खबरदारी घेतल्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.
आज सकाळी हिंदवाडी येथील जैन महाविद्यालयाजवळील निवासी भागात ही घटना घडली. येथे घराच्या कंपाउंड वॉलसाठी जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम सुरू असताना भूमिगत पाईपलाईनला अपघाताने धडक बसली. ही पाईपलाईन मेघा गॅस कंपनीची असल्याचे समजते. धडकेनंतर गॅस गळती सुरू झाल्याने परिसरात गॅसचा वास पसरला आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक नितीन जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी संबंधित गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने मदत बोलावली. अधिकारी येईपर्यंत त्यांनी परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत सुरक्षिततेची उपाययोजना केली.
नंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने पाईपलाईनचा गॅसपुरवठा बंद करून दुरुस्तीची कामे केली. नगरसेवकांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली असून त्यांच्या जलद कृतीबद्दल कौतुक करण्यात येत आहे.








