बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तालुक्यातील श्री सिद्धेश्वर मंदिर, कणबर्गी परिसरात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून महाराष्ट्र पासिंगची पांढऱ्या रंगाची कार संशयास्पद स्थितीत उभी असून ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविकांची वर्दळ असते. अशा ठिकाणी अनोळखी कार दीर्घकाळ उभी राहिल्याने विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत. संबंधित कार कोणाची आहे, ती तिथे कशी आली आणि इतक्या दिवसांपासून का हलविण्यात आली नाही, याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने नागरिक अस्वस्थ झाले आहेत.
या कारमुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना तसेच स्थानिकांना त्रास होत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे. गावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन वाहन ताब्यात घ्यावे व मालकाचा शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. परिसरातील सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशीही मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.








