- कोर्टाच्या आदेशानुसारच कारवाई ; खोट्या बातम्यांवर विश्वास नको – इस्कॉन
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव येथील सीटीएस २११, शुक्रवार पेठ, टिळकवाडी येथील मालमत्ता ही इस्कॉन संस्थेचीच असून त्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या चार कुटुंबांना न्यायालयीन प्रक्रियेनंतरच बेलिफमार्फत नियमानुसार बाहेर काढण्यात आले आहे. या प्रकरणात कोणतीही नियमबाह्य कारवाई करण्यात आलेली नाही, असा खुलासा इस्कॉनच्या वतीने करण्यात आला आहे. यासंदर्भातील निवेदन गुरुवारी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना सादर करण्यात आले.
इस्कॉनच्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित जागा २००३ साली नोंदणीकृत निरंतर पट्ट्याने घेण्यात आली होती. त्यावेळी त्या परिसरात एकूण १४ कुटुंबे वास्तव्यास होती. सर्व कुटुंबांना जागा रिकामी करण्याची विनंती करून अन्य ठिकाणी जागा खरेदी व घरबांधणीसाठी मदत देण्याची तयारी दर्शविण्यात आली होती. त्यानुसार दहा कुटुंबांनी स्वेच्छेने ताबा सोडून अन्यत्र स्थलांतर केले.
मात्र बिरजे, धमुने आणि पिंपरे या कुटुंबांनी स्थलांतरास नकार देत जागा रिकामी करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे मूळ दावा क्रमांक ३९०, ३९२, ५०८ आणि ४८९/२०१७ असे दावे न्यायालयात दाखल करण्यात आले. संबंधित कुटुंबांनी या निर्णयाविरोधात अपील केले; परंतु न्यायालयाने ते फेटाळून लावले.
यानंतर न्यायालयाने ई.पी. १४४, १४५, १४६ व १४७ अन्वये घरे मोकळी करून जागा इस्कॉनच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. त्या आदेशानुसार बेलिफमार्फत कारवाई करण्यात आली, असे इस्कॉनने स्पष्ट केले आहे.
संपूर्ण प्रक्रिया न्यायालयीन आदेशांनुसार पार पडलेली असताना काही वृत्तपत्रे व समाजमाध्यमांतून चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही इस्कॉनच्या वतीने करण्यात आले आहे.








