- रुग्णाने चावा घेतल्यानंतर कुटुंबीयांकडून मारहाण
- घटनेच्या निषेधार्थ बीम्ससमोर कर्मचाऱ्यांचे आंदोलन
- हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी
- संचालकांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव येथील बीम्स रुग्णालयात एका मानसिक रुग्ण तरुणीने ड्युटीवरील नर्सिंग अधिकाऱ्याचा हात चावल्याची घटना घडली. त्यानंतर संबंधित तरुणीच्या कुटुंबीयांनी कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याने नर्सिंग अधिकारी बसवराज कबडगी गंभीर जखमी झाले. या घटनेच्या निषेधार्थ नर्सिंग कर्मचाऱ्यांनी आज बीम्ससमोर निदर्शने करत हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेली मानसिक रुग्ण तरुणी पिण्याच्या पाण्याच्या कारणावरून दुसऱ्या वॉर्डमध्ये गेली होती. तेथील कर्मचाऱ्यांनी तिला तिचा वॉर्ड सोडून येथे का आली, अशी विचारणा केली असता तिने शिवीगाळ केली. त्यानंतर झालेल्या वादात संबंधित तरुणीने ड्युटीवरील नर्सिंग अधिकारी बसवराज कबडगी यांचा हात चावला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या तरुणीच्या कुटुंबीयांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. या हल्ल्यात बसवराज कबडगी यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रुग्णालयात सुमारे ३५० हून अधिक वैद्यकीय कर्मचारी रात्रंदिवस सेवा देत असताना अशा प्रकारच्या घटना घडणे दुर्दैवी असल्याची भावना नर्सिंग अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. “सेवा देणाऱ्यांवरच हल्ले होत असतील तर आम्ही काम कसे करायचे?” असा सवाल करत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची हमी देण्याची मागणी नर्सिंग अधिकारी खादीर मुजावर यांनी केली.

घटनेची माहिती मिळताच बीम्सचे संचालक अशोक कुमार शेट्टी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सांगितले की, या प्रकरणी एपीएमसी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त यांना पत्र लिहून रुग्णालयातील सुरक्षेसाठी आवश्यक संरक्षणाची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संचालकांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नर्सिंग कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे. मात्र दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.








