- नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या लिंगराज कॉलेज जवळ बिबट्या दिसल्याची चर्चा रंगताच परिसरात काही काळ घबराट पसरली. माहिती मिळताच वनविभागाने तातडीने हालचाली सुरू करून परिसरात शोधमोहीम राबवली.
या संदर्भात विभागीय वन अधिकारी एन. ई. क्रांती यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य देत कॉलेज परिसर आणि आसपासच्या झुडपांची कसून तपासणी करण्यात आली आहे. संशयास्पद ठिकाणी कर्मचारी तैनात करून परिस्थितीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे.
प्राथमिक तपासणीत बिबट्या किंवा इतर कोणत्याही वन्यप्राण्याच्या उपस्थितीची ठोस चिन्हे आढळून आलेली नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. “कोणालाही इजा झालेली नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र कोणत्याही वन्यप्राण्याचे दर्शन झाल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा,” असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, वनविभागाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू ठेवल्या असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.







