- खासदार जगदीश शेट्टर यांची संसदेत मागणी
बेळगाव / प्रतिनिधी
देशातील सात प्रमुख शहरांचा हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पात समावेश केल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन करतानाच बेंगळूर–बेळगाव–मुंबई असा आठवा हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर तातडीने जाहीर करावा, अशी मागणी खासदार जगदीश शेट्टर यांनी संसदेत केली. या मार्गामुळे बेळगावसह उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्रातील शहरांच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मंगळवारी संसदेत अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेत सहभागी होताना शेट्टर बोलत होते. केंद्र सरकारने पाच वर्षांत सुमारे २० हजार कोटी रुपयांच्या माध्यमातून टू आणि थ्री टायर शहरांच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र बेंगळूर–मुंबई या महत्त्वाच्या मार्गावर बेळगावचा समावेश असलेला स्वतंत्र हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारल्यास औद्योगिक, व्यापारी आणि शैक्षणिक क्षेत्रात वेगाने प्रगती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बेळगावमध्ये लष्करी केंद्रासाठी सुमारे एक हजार एकर मोकळी जागा उपलब्ध असून त्या ठिकाणी संरक्षण क्लस्टर स्थापन करावे, अशीही त्यांनी मागणी केली. संरक्षण उपकरण निर्मिती युनिट उभारल्यास स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे ते म्हणाले.
कळसा–भांडुरा प्रकल्पाच्या प्रस्तावास तातडीने मंजुरी देण्याचा आग्रहही त्यांनी धरला. रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांसाठी केंद्राने हजारो कोटी रुपयांचा निधी जाहीर करूनही राज्य सरकारकडून भूसंपादनासाठी निधी न दिल्याने कामे रखडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत अनेक शहरांना विमानसेवा उपलब्ध झाली होती. मात्र तीन वर्षांनंतर योजनेची मुदत संपल्याने काही ठिकाणी सेवा बंद पडल्या आहेत. त्यामुळे उडान योजनेचा कालावधी किमान पाच ते दहा वर्षांनी वाढवावा, अशी मागणी त्यांनी केली. २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातील विविध तरतुदींचे त्यांनी स्वागत करत विकासाभिमुख धोरणांचे कौतुक केले.








