- बेळगावकरांचा उदंड प्रतिसाद ; चार दिवसांत लाखो नागरिकांची उपस्थिती
- शहर विकास चर्चासत्र ठरले आकर्षण
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव क्रेडाईच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या ‘बेल्कॉन’ गृहनिर्माण व बांधकाम प्रदर्शनाची रविवारी रात्री यशस्वी सांगता झाली. चार दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला बेळगावकरांनी लाखोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवत उदंड प्रतिसाद दिला.
सीपीएड मैदानावर तब्बल एक लाख स्क्वेअर फुट जागेत उभारण्यात आलेल्या संपूर्ण वातानुकूलित भव्य शामियान्यात बेल्कॉन प्रदर्शन यंदा शहरातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरले. गृहनिर्माण, बांधकाम साहित्य, अंतर्गत सजावट, वित्तीय संस्था आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित नामवंत कंपन्यांचे स्टॉल्स येथे एकाच छताखाली उपलब्ध होते. स्वप्नातील घरासाठी आवश्यक सर्व माहिती नागरिकांना थेट मिळाल्याने प्रदर्शनाला मोठी गर्दी झाली.
प्रदर्शनादरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बांधकाम क्षेत्रात रस असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळा, आकर्षक भेटवस्तू योजना, फूड कोर्ट आणि मनोरंजनात्मक खेळ यामुळे कुटुंबांसह नागरिकांनी मोठ्या उत्साहात प्रदर्शनाला भेट दिली. शेवटच्या दिवशी शहराच्या सर्वांगीण विकासावर आधारित ‘विकास मंथन’ चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला मान्यवरांचा आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
रविवारी रात्री झालेल्या सांगता समारंभाला रोटरीचे माजी प्रांतपाल आणि उत्तर कर्नाटक क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष अविनाश पोतदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी परीक्षकांनी निवडलेल्या उत्कृष्ट स्टॉलधारकांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
या प्रदर्शनाला पालकमंत्री सतीश जारकीहोळी, माजी मुख्यमंत्री व खासदार जगदीश शेट्टर, आमदार असिफ (राजू) सेठ, विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, केएलईचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत क्रेडाई बेळगावच्या उपक्रमाचे कौतुक केले.
हे भव्य प्रदर्शन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष युवराज हुलजी, इव्हेंट चेअरमन प्रशांत वांडकर, व्हाइस चेअरमन प्रशांत पाटील, कोषाध्यक्ष सुधीर पनारे, जनसंपर्क प्रमुख सचिन बैलवाड यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य आणि यश इव्हेंट्सच्या टीमने विशेष मेहनत घेतली.








