- एकाला अटक ; रोकड व साहित्य जप्त
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावच्या उपनगरातील हिरेबागेवाडी परिसरात बेकायदेशीर मटका जुगारावर पोलिसांनी ठोस कारवाई केली. सार्वजनिक ठिकाणी पैशांचे आमिष दाखवून ‘कल्याण मटका’ चालवणाऱ्या एका व्यक्तीस पोलिसांनी रंगेहाथ पकडत अटक केली.
हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील बससापूर रस्त्यालगत सार्वजनिक ठिकाणी मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत शिवबसवनगर, हिरेबागेवाडी येथील रहिवासी महंमदअली गौससाब सनदी (वय ४०) याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून १,२६० रुपयांची रोकड तसेच मटका लिहिण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पीआय सुंद्रेश के. होळेन्नवर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. संबंधित आरोपीविरुद्ध कर्नाटक पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
अवैध जुगार व मटका धंद्यांमुळे जनतेची आर्थिक फसवणूक होत असल्याने अशा कृत्यांविरोधात कठोर भूमिका घेण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या कारवाईबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त व उपायुक्तांनी हिरेबागेवाडी पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले असून, शहर व परिसरात अशा बेकायदेशीर व्यवसायांवर लक्ष अधिक तीव्र करण्यात आले आहे.








