चलवेनहट्टी : येथील ब्रह्मलिंग देवस्थानात पारंपरिक इंगळ्या उत्सव रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरा केला जाणार आहे. दरवर्षी रेणुका देवीची यात्रा पूर्ण झाल्यानंतर हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आयोजित केला जातो.
यंदा देखील रविवारी सायंकाळी ४ वाजता इंगळ्या उत्सवास प्रारंभ होणार असून पहाटे देवाचा अभिषेक करण्यात येईल. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. पुढे सायंकाळी देवांना पालखीतून प्रदक्षिणेसाठी बाहेर काढले जाणार असून दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
प्रदक्षिणेचा कार्यक्रम संपल्यानंतर देव पुन्हा गादीवर विराजमान होतील. त्यानंतर नवसपूर्तीसाठी भाविकांकडून श्रीफळाचा वर्षाव केला जातो. यावेळी वर्षाव होणारी श्रीफळे पकडण्यासाठी मोठी गर्दी होत असून हा सोहळा पाहण्यासाठीही भाविकांची मोठी झुंबड उडते.
यानंतर मुख्य इंगळ्या उत्सवाला सुरुवात होते. अत्यंत शांत आणि भक्तिमय वातावरणात देवावर गाऱ्हाणे घालून इंगळ्यांची विधीवत पूजा केली जाते. वरीलप्रमाणे इंगळ्या उत्सव साजरा होणार असून सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी.








