• ‘जय जय स्वामी समर्थ’ जयघोषात गोवा वेस दत्त मंदिरातून पालखी मिरवणूक

बेळगाव / प्रतिनिधी

अक्कलकोट येथून निघालेल्या श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी परिक्रमेचे आज सोमवारी सायंकाळी बेळगावातील गोवा वेस येथील श्री दत्त मंदिरात भक्तिभावपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी परिसर ‘जय जय स्वामी समर्थ’ या जयघोषाने दुमदुमून गेला.

श्री अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजय राजे विजयसिंह भोसले व कार्यकारी अध्यक्ष अमोल राजे जनमेजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही पादुका पालखी परिक्रमा यंदा २९ व्या वर्षात पदार्पण करत आहे. परंपरेनुसार यंदाही बेळगावात सर्वप्रथम श्री दत्त मंदिरात पादुका व पालखीची विधिवत पूजा व आरती संपन्न झाली.

त्यानंतर पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. पालखीच्या अग्रभागी भजनी मंडळ व बँडच्या गजरात संपूर्ण मार्ग भक्तिमय झाला. गोवा वेस, बसवेश्वर चौक, कोरे गल्ली, कचेरी गल्ली मार्गे पालखी परिक्रमा शहापूर येथील हट्टीओळ गल्ली येथे दाखल झाली. मिरवणूक मार्गावर हजारो भाविकांनी पादुकांचे दर्शन घेतले. अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी, ओवाळणी व आरती करण्यात आली.

या मिरवणुकीत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (अक्कलकोट) चे उपाध्यक्ष अभय खोबरे, नेमिनाथ गरगट्टे, प्रभाकर नाकाडी, मोहन लाड, राजेंद्र गायकवाड, संतोष भोसले, टी.सी. बेकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने स्वामीभक्त सहभागी झाले होते.

हट्टीओळ गल्ली येथे पादुका पालखीची पूजा व त्यानंतर प्रसाद वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी दुपारी येथून पालखी परिक्रमा महाद्वार रोडवरील श्री स्वामी समर्थ आराधना केंद्राकडे प्रस्थान करणार असून, याच ठिकाणी पालखीचा मुक्काम राहणार आहे.