• शिवाजी उद्यानात आशयघन कवितांची रेलचेल
  • संक्रांत व हुतात्मा दिनाचे औचित्य

बेळगाव / प्रतिनिधी

बाग परिवाराच्या वतीने नववर्षाच्या सुरुवातीचा जानेवारी महिन्यातील पहिला काव्यवाचनाचा कार्यक्रम नुकताच शिवाजी उद्यानात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मकर संक्रांत आणि हुतात्मा दिनाचे औचित्य साधत कवी-कवयित्रींनी सामाजिक, सांस्कृतिक, स्त्रीवादी, ऐतिहासिक व भावनिक अशा विविध विषयांवर आशयघन कविता सादर करून कार्यक्रमात काव्यगुंजन घडवले.

हा कार्यक्रम बाग परिवारातील ज्येष्ठ कवी निळूभाऊ नार्वेकर आणि किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.रोशनी हूंद्रे यांनी ‘राधेय’, माया पाटील यांनी ‘पंढरीची वारी’ व ‘शाळेची वारी’, तर प्रा. शुभदा खानोलकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित पोवाडा सादर करून रसिकांची दाद मिळवली.

अस्मिता आळतेकर यांनी स्त्री विषयक ‘सन्मान’, चंद्रशेखर गायकवाड यांनी ‘वन रिग्रेट रिमेन्ड’, स्मिता किल्लेकर यांनी ‘बळीराजा’, अशोक सुतार यांनी ‘आहेर’, किरण पाटील यांनी ‘अमृतधारा’, जोतिबा नागवडेकर यांनी ‘बळी’, प्रा. डॉ. मनीषा नाडगौडा यांनी ‘प्रीत तुझी’, शीतल पाटील यांनी ‘पुत्रविवाह’, अपर्णा पाटील यांनी ‘मी माझी’, विजयश्री चव्हाण यांनी ‘हुंदका सीमावासीयांचा’ तर निळूभाऊ नार्वेकर यांनी ‘सुरकुत्यांचे जाळे’ ही कविता सादर करून कार्यक्रमाला वैचारिक उंची दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन शीतल पाटील यांनी प्रभावीपणे पार पाडले, तर आभारप्रदर्शन किरण पाटील यांनी केले.