बेळगाव : सीमावासियांचे आधारवड, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, शिक्षणतज्ज्ञ व संपूर्ण आयुष्य सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी अर्पण करणारे एन. डी. पाटील यांची पुण्यतिथी शनिवारी बेळगावात गांभीर्याने पाळण्यात आली. त्यांच्या जाण्याने सीमावासीय पोरके झाले असून, सीमाप्रश्नाच्या चळवळीत आजही क्षणोक्षणी त्यांच्या नेतृत्वाची आणि मार्गदर्शनाची उणीव प्रकर्षाने जाणवत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कॉलेज रोडवरील समितीच्या कार्यालयात हा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले की, एन. डी. पाटील यांच्या एका शब्दावर महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेते एकवटत असत. सीमाप्रश्नाच्या लढ्यात त्यांचे योगदान अतुलनीय आहे. विशेष म्हणजे, त्यांचा स्मृतिदिन सीमाभागातील पहिल्या सत्याग्रहाच्या काळात येतो, हा योगायोग त्यांच्या सीमाप्रश्नाविषयी असलेल्या तळमळीचेच प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस मोनाप्पा संताजी यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर माजी आमदार मनोहर किणेकर व लक्ष्मण होनगेकर यांच्या हस्ते डॉ. एन. डी. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीचे अध्यक्ष राजू किणयेकर, अनिल पाटील, मेगो बिर्जे, महादेव बिर्जे, दीपक पावशे, नारायण सांगावकर, आप्पासाहेब कीर्तने, संजय पाटील यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.