- क्रेडाई बेळगाव व यश इव्हेंट्सतर्फे सीपीएड मैदानावर आयोजन
बेळगाव / प्रतिनिधी
क्रेडाई बेळगाव आणि यश इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बेल्कॉन २०२६’ बांधकाम, प्रॉपर्टी, बांधकाम साहित्य, इंटिरियर्स, एक्स्टेरिअर, फर्निचर तसेच भव्य ऑटो एक्स्पोचे आयोजन येत्या ५ ते ८ फेब्रुवारीदरम्यान सीपीएड मैदानावर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच हे संपूर्ण प्रदर्शन अत्याधुनिक आणि सुसज्ज वातानुकूलित शामियान्यात भरविण्यात येणार आहे, अशी माहिती क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष युवराज हुलजी, इव्हेंट चेअरमन प्रशांत वांडकर आणि यश इव्हेंट्सचे संचालक प्रकाश कालकुंद्रीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना युवराज हुलजी म्हणाले की, बेंगळुरूनंतर कर्नाटकात बेळगावमध्ये अशा प्रकारचे भव्य रिअल इस्टेट, इंटिरियर्स आणि बांधकाम साहित्य प्रदर्शन आयोजित होत आहे. तीन राज्यांच्या सीमेवर असलेले बेळगाव शहर झपाट्याने विकसित होत असून बांधकाम क्षेत्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातील घरासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती आणि साहित्य एकाच छताखाली उपलब्ध व्हावे, या उद्देशाने क्रेडाई बेळगावतर्फे सलग आठव्या वर्षी ‘बेल्कॉन’चे आयोजन करण्यात येत आहे.
इव्हेंट चेअरमन प्रशांत वांडकर यांनी सांगितले की, सुमारे एक लाख स्क्वेअर फूट क्षेत्रात हे बेल्कॉन व ऑटो एक्सपो प्रदर्शन होणार असून, बेल्कॉनमध्ये १५० स्टॉल्स असतील. यामध्ये फ्लॅट्स, बंगले, विटा, वाळू, स्टील, प्लायवूड, लाइटिंग, गृहसजावट, लिफ्ट्स यांसह बांधकाम क्षेत्रातील सर्व महत्त्वपूर्ण साहित्य व सेवांची माहिती नागरिकांना मिळणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात कार्यशाळा, चर्चासत्रे, स्पर्धा तसेच ‘बेळगाव डेव्हलपमेंट कॉन्क्लेव्ह’सारखे विशेष उपक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. या प्रदर्शनाला प्रिया शक्ती स्टील, ओरियनिस, जीएम लाइटिंग, विशाल इन्फ्रास्ट्रक्चर, व्हिव्हा, श्रीराम इन्वोकेशन, साईराज कन्स्ट्रक्शन, चैतन्य डेव्हलपर्स, पार्वती कन्स्ट्रक्शन, वात्सल्य कन्स्ट्रक्शन आदी प्रायोजकांचे सहकार्य लाभले आहे.
क्रेडाईचे वरिष्ठ पदाधिकारी आनंद कुलकर्णी यांनी सांगितले की, या प्रदर्शनात स्थावर मालमत्ता सल्लागार व बांधकाम व्यावसायिक सहभागी होणार असून, ग्राहकांना प्लॉट्स, फ्लॅट्स, व्यावसायिक जागा, नाविन्यपूर्ण बांधकाम साहित्य, आधुनिक इंटिरियर डिझाईन तसेच आकर्षक ऑफर्स आणि सवलतींचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. राजेंद्र मुतगेकर यांनी क्रेडाईतर्फे बेळगाव शहराच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. चैतन्य कुलकर्णी आणि सुधीर पनारे यांनीही आपले विचार मांडले.
ऑटो एक्स्पो संदर्भात माहिती देताना यश इव्हेंट्सचे संचालक प्रकाश कालकुंद्रीकर म्हणाले की, सलग सातव्या वर्षी ऑटो एक्स्पोचे आयोजन होत असून, यामध्ये १०० स्टॉल्सवर नामांकित कंपन्यांच्या कार, दुचाकी, ई-वाहने, वाहनांचे स्पेअर पार्ट्स, विंटेज कार्स तसेच स्टंट ड्रायव्हिंगचे आकर्षक सादरीकरण पाहायला मिळणार आहे. ‘बेल्कॉन २०२६’ आणि ऑटो एक्सपोला यंदाही बेळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला क्रेडाईचे महेश फगरे, ज्ञानेश्वर सायनेकर, सचिन बैलवाड, तसेच यश इव्हेंट्सचे अजिंक्य कालकुंद्रीकर, विनय कदम, प्रायोजक प्रतिनिधी व अन्य सदस्य उपस्थित होते.








