बेळगाव / प्रतिनिधी
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान दिलेल्या पहिल्या हुतात्म्यांना बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कंग्राळी खुर्द येथे अभिवादन करण्यात आले. कंग्राळी गावचे सुपुत्र हुतात्मा मारुती बेन्नाळकर आणि हुतात्मा बाळू निलजकर यांच्या स्मृतीस मानवंदना अर्पण करण्यात आली.

या कार्यक्रमात कमल मन्नोळकर, मनोहर हुंदरे, पियूष हावळ, आर. के. पाटील, डॉ. राजगोळकर, तालुका समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, अध्यक्ष मनोहर किणेकर आणि सचिव एम. जी. पाटील यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे ऐतिहासिक महत्त्व, हुतात्म्यांचे बलिदान आणि ते जपण्याची आजच्या पिढीची जबाबदारी यावर विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षा माजी आमदार बी. आय. पाटील यांच्या पत्नी पौर्णिमा पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत, हुतात्म्यांचा त्याग कधीही विसरता कामा नये, असे प्रतिपादन केले. यावेळी हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांच्या कन्येला साडी-चोळी देऊन समितीच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. हुताम्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








