- महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे आवाहन
बेळगाव / प्रतिनिधी
१७ जानेवारी १९५६ रोजी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या मराठी भाषिक हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी शनिवार, दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ठीक ९.३० वाजता बेळगाव येथील हुतात्मा चौकात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशी मान्य करत तत्कालीन केंद्र सरकारने बेळगावसह मराठी बहुल भाग कर्नाटकात समाविष्ट केल्याची घोषणा केल्यानंतर सीमाभागात तीव्र उद्रेक उसळला होता. या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरलेल्या मराठी भाषिकांवर १७ जानेवारी १९५६ रोजी तत्कालीन मुंबई सरकारने अमानुष गोळीबार केला. या गोळीबारात पैलवान मारुती बेन्नाळकर, महादेव बारागडी, लक्ष्मण गावडे, मधु बांदेकर तसेच निपाणी येथील कमळाबाई मोहिते यांनी हौतात्म्य पत्करले. त्यानंतर झालेल्या सत्याग्रह आंदोलनात खानापूरचे नागप्पा होसुरकर यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला.
या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानाला वंदन करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्व मराठी भाषिकांनी हुतात्मा चौकात एकत्र येऊन अभिवादन करावे, असे समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
हे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष वासू सामजी, राजू कदम, सिद्धार्थ चौगुले, सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार विनायक कावळे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.








