बेळगाव / प्रतिनिधी

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने सोमवार दि. १२ जानेवारी रोजी बेळगाव येथील समिती कार्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती श्रद्धा व उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.

युवा समितीचे समाजमाध्यम प्रमुख साईनाथ शिरोडकर यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे, तर चिटणीस प्रतीक पाटील यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानंतर बोलताना प्रतीक पाटील म्हणाले की, राजमाता जिजाऊ यांच्या दूरदृष्टीतूनच अंधारलेल्या काळात स्वराज्याची ज्योत पेटली आणि सर्वसामान्य रयतेला केंद्रस्थानी ठेवणारे हिंदवी स्वराज्य साकार झाले. स्वराज्य म्हणजे स्वकीयांचे, सर्वसमावेशक राज्य असल्याचा आदर्श त्यांनी घालून दिला.

स्वामी विवेकानंद यांनीही हाच सर्वसमावेशकतेचा संदेश संपूर्ण जगाला दिला. १८९३ साली झालेल्या जागतिक धर्मपरिषदेत “माझ्या प्रिय बंधू भगिनींनो” या शब्दांतून त्यांनी भारताची सहिष्णुता, मानवतावाद आणि सर्वांना सामावून घेणारी संस्कृती जगासमोर मांडली. भारत देश ‘वसुधैव कुटुंबकम’ या तत्त्वावर चालणारा असून, संपूर्ण विश्वाला एक कुटुंब मानणारा आहे, ही ओळख पुन्हा अधोरेखित करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष राजू कदम, सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार विनायक कावळे, सुरज कुडूचकर, आनंद पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.