बेळगाव / प्रतिनिधी

नवी दिशा, नवी आशा, नवीन संकल्पासह बेळगावकरांनी सरत्या वर्षाला निरोप देत २०२६ या नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. शहरवासीयांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सहकुटुंब थर्टी फर्स्टचा आनंद लुटला. शहरात मध्यरात्री ओल्ड मॅनचे दहन करून नववर्षांच्या शुभेच्छा देण्यात आल्या. नववर्षानिमित्त शहरातील मांसाहार दुकानातही दिवसभर गर्दी पहायला मिळाली. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सगळीकडचे हॉटेल्स, रिसॉर्ट, ढाबा एवढेच नाही तर अगदी शेतात सुध्दा तरुणांनी पार्टी करून जुन्या वर्षाला निरोप दिला. रात्री १२ वाजता जागोजागी रोषणाई, फटाके आणि हॅप्पी न्यू इयरच्या शुभेच्छा देण्यात आल्या. २०२५ मधील अखेरच्या दिवशी सूर्यास्ताच्या साक्षीने गेल्या वर्षभरातील आठवणी मागे सारत बेळगावकरांनी नवीन वर्षाचे संकल्प केले. तत्पूर्वी, सकाळपासूनच शहरात सर्वत्र थर्टी फर्स्टचा फिव्हर पाहायला मिळाला. मध्यरात्री १२ च्या ठोक्याला आतषबाजी करत तसेच नृत्याच्या तालावर ठेका धरत एकमेकांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. इमारती, सोसायटींमध्ये देखील या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. रात्री उशिरापर्यंत हॉटेलमध्ये गर्दी पहायला मिळाली, नववर्ष स्वागतासाठी तरुणाई संगीतावर थिरकली.

सरत्या वर्षात कोणताही गैरप्रकार प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलिसांनीही प्रयत्न केले. यासाठी पोलिस दलाने जिल्ह्यात ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. ३१ डिसेंबरला बुधवार होता. त्यामुळे अनेकांनी पाट्यांचे बेत आखले होते. शहरी धांगडधिंगा पासून दूरवर रम्य ठिकाणी जाऊन अनेकांनी नववर्ष साजरे केले. बेळगाव शहरासह ग्रामीण भागात ओल्ड मॅन जाळून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. यंदाही कॅम्पसह काळी अमराई, नार्वेकर गल्ली, गवळी गल्ली, शहापूर, वडगाव आदी भागात मोठ्या प्रमाणात ओल्ड मॅन तयार केले होते. ३१ डिसेंबरला मध्यरात्री १२ वाजता ओल्ड मॅन दहन करून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. नवीन वर्षात अनेकांनी वेगवेगळे संकल्प केले आहेत. तरुणाईने देखिल अनेक संकल्प केले आहेत.

समाज माध्यमातून शुभेच्छा समाज माध्यमामध्येही थर्टी फर्स्टचा फिव्हर पाहायला मिळाला. नेटिझन्सनी व्हॉटस्ॲप, फेसबुक, इन्स्ट्राग्राम यांसह अन्य समाज माध्यमातून एकेमकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. २०२६ वर्ष आपणास सुखाचे, समाधानाचे व आरोग्यदायी जावो, अशी मनोकामना व्यक्त करत नागरिकांनी शुभेच्छा दिल्या. काहींनी संदेश देऊन तर काहींनी व्हिडिओच्या माध्यमातून परस्परांना शुभेच्छा दिल्या.