• जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव जिल्ह्यात अनुसूचित जाती आणि जमातींवरील अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कठोर आणि तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले.

बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अनुसूचित जाती–जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत झालेल्या प्रगती आढावा बैठकीत ते बोलत होते. बीआयएमएसमध्ये अनुसूचित जाती–जमातींवर अन्याय झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी विशेष दक्षता घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी दलित नेत्या विजया तलवार यांनी शहरातील आरपीडी सर्कलमध्ये वीर मडकरी नायक यांचा पुतळा उभारून त्या चौकास त्यांचे नाव देण्याची मागणी मांडली.

वन विभागातील पदोन्नतीबाबत संयुक्त समितीच्या सूचनेनुसार वन विभाग व समाजकल्याण विभागाची समन्वय बैठक घेण्यात आल्याची माहिती डीएफओ क्रांती यांनी दिली. लवकरच पुढील बैठक घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक बसरगी, दलित संघटनेचे नेते मल्लेश चौगुले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.