बेळगाव / प्रतिनिधी
होदेगेरी येथील छत्रपती श्री शहाजी महाराज यांच्या समाधी स्थळावर भव्य स्मारक उभारण्याच्या दीर्घकालीन मागणीला आता ठोस दिशा मिळू लागली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवार दि. २० डिसेंबर २०२५ रोजी विधान परिषद सदस्य आमदार एम. जी. मुळे यांची बेळगाव येथे सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीत स्मारक उभारणीसह विविध विकासात्मक व समन्वयात्मक विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
होदेगेरी येथील समाधी स्थळासाठी मूळ संकल्पना प्रस्ताव आमदार मुळे यांनीच तयार केला असून, त्यासाठी ते सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश येत बेळगावचे पालकमंत्री श्री सतीश जारकीहोळी यांनी स्मारकासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबद्दल मंत्री जारकीहोळी आणि आमदार मुळे यांचे अभिनंदन करण्यात आले.
या प्रकल्पासंदर्भात महाराष्ट्र शासनाने प्राचार्य आनंद आपटेकर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. बैठकीदरम्यान महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री श्री शंभूराजे देसाई यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला, त्यावेळी जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.
या प्रस्तावित बैठकीत छत्रपती शहाजी महाराज समाधी स्मारक उभारणीबाबत ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या सदिच्छा भेटीच्या वेळी प्राचार्य आनंद आपटेकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी उपस्थित होते.







