• विधानसभा आणि विधानपरिषदेत सत्ताधारी – विरोधकांत जोरदार खडाजंगी

बेळगाव / प्रतिनिधी

प्रचंड गोंधळ आणि विरोधकांचा तीव्र विरोध झुगारून कर्नाटक सरकारने द्वेष भाषण व द्वेषपूर्ण गुन्हे प्रतिबंधक (हेट स्पीच) विधेयक गुरुवारी विधानसभेत मंजूर केले. यानंतर विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी संताप व्यक्त करत विधेयकाची प्रत फाडली. या विधेयकावरून विधान परिषदेतही सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.

विरोधी पक्षांनी या विधेयकावर टीका करत, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असून काँग्रेसकडून लादलेली ‘दुसरी आणीबाणी’ आहे, असा आरोप केला. दोन्ही सभागृहांत विरोधकांनी तीव्र घोषणाबाजी करत सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शविला.

विधानसभेत चर्चेदरम्यान गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी विधेयकाचे समर्थन केले. या कायद्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था मजबूत होईल, प्रक्षोभक भाषणांमुळे होणारे तणाव आणि जिल्हा बंदीसारख्या परिस्थितींना आळा बसेल, असे त्यांनी स्पष्ट केले. एखाद्या समाज, व्यक्ती किंवा संस्थेला जाणीवपूर्वक लक्ष्य करणाऱ्या भाषणांवर नियंत्रण आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र विरोधकांनी या विधेयकामुळे प्रसारमाध्यमे, पत्रकार, व्यंगचित्रकार आणि टीकाकारांवर कारवाईची टांगती तलवार राहील, असा इशारा दिला. पोलिसांना अमर्याद अधिकार दिल्याने कायद्याचा सूडबुद्धीने गैरवापर होण्याची शक्यता असल्याचा आरोपही करण्यात आला.

चर्चेदरम्यान नगरविकास मंत्री बैरती सुरेश यांनी किनारपट्टी भागातील आमदारांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भाजप आमदार संतप्त झाले. यावरून सभागृहात मोठा गोंधळ उडाला. विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले; मात्र परिस्थिती न सुधारल्याने अखेर संख्याबळाच्या जोरावर विधेयक मंजूर झाल्याची घोषणा करण्यात आली.

दरम्यान, विधान परिषदेतही या विधेयकावर तीव्र वाद झाला. भाजप सदस्य सी. टी. रवी यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या वक्तव्यावरून सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतल्याने सभागृहात कोलाहल झाला. सभापती बसवराज होरट्टी यांनी समज दिल्यानंतर सी. टी. रवी यांनी दिलगिरी व्यक्त केली. चर्चेदरम्यान काही काळ मुख्यमंत्री सिद्धरामय्याही सभागृहात उपस्थित होते.