- शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांचा इशारा
कोल्हापूर / प्रतिनिधी
बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या ‘महामेळाव्या’ला परवानगी नाकारून मराठी भाषिकांच्या भावना दडपण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारने केल्यास, महाराष्ट्रात येणाऱ्या कर्नाटकातील कोणत्याही राजकारण्याला प्रवेश दिला जाणार नाही, असा कठोर इशारा कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी दिला आहे.
दरवर्षी कर्नाटक सरकार बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन घेते आणि त्याचवेळी महाराष्ट्र एकीकरण समिती मराठी भाषिकांच्या भावना व्यक्त करण्यासाठी महामेळावा आयोजित करते. मात्र, बेळगावचे जिल्हाधिकारी या महामेळाव्याला परवानगी देत नाहीत.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. देवणे म्हणाले, “उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अनेक नेते या महामेळाव्यासाठी बेळगावला जाणार आहेत. कर्नाटक सरकारने कोणताही अडथळा निर्माण करू नये.”
तसेच त्यांनी स्पष्ट केले की, “जर कर्नाटक सरकारने मराठी जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला, तर अधिवेशन काळात महाराष्ट्रात येणाऱ्या कर्नाटकच्या कोणत्याही नेत्याला आम्ही फिरकू देणार नाही. मराठी जनतेवरील अन्याय आम्ही सहन करणार नाही,” असा सज्जड इशारा त्यांनी दिला.








