बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘डॉ. शिवबसव महाप्रभू बेळगाव रेल्वे स्टेशन’ करण्यात यावे, अशी औपचारिक मागणी बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
खासदार शेट्टर यांनी दिल्लीतील नवीन संसद भवनात रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन या मागणीवर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आवाहन केले. कर्नाटक सरकारने नामांतराचा प्रस्ताव यापूर्वीच केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवला असून, रेल्वे मंत्रालयाकडूनही आवश्यक मतप्रक्रिया पूर्ण करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या मागणीवर रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत बेळगावकरांच्या दीर्घ प्रतिक्षेला न्याय देण्याचे आश्वासन दिल्याचे खासदार शेट्टर यांनी सांगितले.
रेल्वे स्थानक नामांतरासोबतच शेट्टर यांनी प्रवाशांच्या मागणीनुसार बेळगाव–बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेसची सुटण्याची वेळ सकाळी ५.२० वरून सकाळी ६.१५ अशी सुधारित करण्याची विनंतीही केली. प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने वेळेत बदल करण्याचा प्रस्ताव तपासण्यात येईल, असे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले. याशिवाय, बेंगळुरू- बेळगाव – मुंबई मार्गावर सुपरफास्ट रेल्वे सुरू करण्याची आणि लोकापूर – रामदुर्ग – सौंदत्ती- धारवाड यांना जोडणाऱ्या प्रस्तावित नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास मंजुरी देण्याची मागणीही शेट्टर यांनी पुढे केली.
खासदार शेट्टर यांनी या सर्व मुद्द्यांवर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही.सोमन्ना यांच्याशीही चर्चा झाल्याचे सांगितले.








