• बेळगावात पीक सर्वेक्षकांची निदर्शने

बेळगाव / प्रतिनिधी

कृषी आणि फलोत्पादन विभागांतर्गत मागील जवळपास दशकभर सेवा बजावत असलेल्या पीक सर्वेक्षकांनी कोणत्याही सुविधा न मिळाल्यामुळे तसेच जीव धोक्यात घालून काम करूनही योग्य संरक्षण नसल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

पीक नोंदणी आणि सर्वेक्षणाचे जबाबदारीचे काम करताना अनेक वेळा जंगल परिसर, दुर्गम भागात त्यांना जाणे आवश्यक होते. अशावेळी सर्प, कीटक, तसेच वन्य प्राण्यांचा धोका कायम असतो. त्यामुळे जीवन विमा आणि सुरक्षा साधनांची तातडीने व्यवस्था करण्यात यावी, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे.

यासोबतच त्यांना मिळणाऱ्या मानधनावरही आंदोलक संताप व्यक्त करत होते. वर्षानुवर्षे फक्त एक रुपयांची वाढ, हा सरकारचा अतिशय अवमानकारक निर्णय असल्याचे त्यांनी ठणकावले. “एका महिन्याचे काम एका आठवड्यात संपवा असे आदेश दिले जातात आणि त्यासाठी मिळते फक्त १ रुपयाची वाढ? हे शोषण नाही तर काय?” असा सवाल संघटनेच्या अध्यक्षांनी उपस्थित केला.

जिल्ह्यातील १५ तालुक्यांतून मोठ्या संख्येने पीक सर्वेक्षक या आंदोलनात सहभागी झाले होते. सरकारने मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनाने पाहून त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.