बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका आणि समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता संविधान दिन २०२५ उत्साहात साजरा केला जाणार असल्याची माहिती दलित नेते मल्लेश चौगुले यांनी आज दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना चौगुले म्हणाले की, विविध दलित संघटनांकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही संविधान अर्पण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून निघणारा संविधान जथ्था चन्नम्मा चौक मार्गे डॉ. आंबेडकर उद्यानात पोहोचेल. सकाळी ११ वाजता या जथ्थ्याचा जाहीर कार्यक्रमात रुपांतर होईल.
या कार्यक्रमाला प्रादेशिक आयुक्त जानकी के. एम. बेळगाव उत्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक डॉ. चेतनसिंग राठोड, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, तसेच महापालिका आयुक्त शुभा बी. आणि समाज कल्याण विभागाचे उपसंचालक रामनगौडा कन्नोळी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून चिक्कोडीचे निवृत्त शिक्षक बी.एस. नाडकर्णी उपस्थित राहतील. शहरातील सर्व नागरिकांनी तसेच दलित बांधवांनी मोठ्या संख्येने संविधान जथ्थ्यात व जाहीर कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मल्लेश चौगुले यांनी केले. कार्यक्रमावेळी दलित संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.








