बेळगाव / प्रतिनिधी
मागील दोन वर्षांपासून अतिवाड गावाला पुरवण्यात येणारी अपुरी बससेवा शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. या समस्येमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी परिवहन विभागाविरोधात मोर्चा काढत रास्तारोको आंदोलन केले. या दरम्यान, परिवहन विभागाच्या प्रतिनिधींना जाब विचारल्यावर गावात शौचालयांची योग्य सुविधा नसल्याचे कारण देत बस चालवा सेवा नियमित करता येत नसल्याचे उत्तर देण्यात आले. अपुरी सेवा आणि अनियमित वेळापत्रकामुळे अतिवाडच्या रहिवाशांना ही गैरसोय सहन करावी लागत आहे.
मोर्चादरम्यान परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांना जबाब विचारण्यात आला असता, बस कर्मचाऱ्यांकडून पाणी आणि शौचालयांच्या अभावाचे कारण देण्यात आले. तरी ग्रामस्थांनी स्पष्ट केले की, अशा सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. गावातील ग्रामपंचायतीनेदेखील शौचालयांसाठी निधी मंजूर केला आहे. परंतु परिवहन विभाग निव्वळ कारणे देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. समस्येचे निराकरण त्वरित न झाल्यास उचगावचा रस्ता बंद करण्याचा इशारा व्यंकटेश हेब्बाळकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने दिला आहे.
बेकिनकेरे येथील आंदोलनात सहभागी झालेल्या एका विद्यार्थिनीने सांगितले की, बससेवा नियमित नसल्यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो. सुट्टीच्या वेळांनाही बस वेळेवर उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
परिवहन विभागाकडे वारंवार निवेदने दिल्यानंतरही कोणतीही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी आज रास्ता रोको करत विभागाकडून उत्तर मागितले. आंदोलक आणि कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाचीही झाली. समस्या त्वरित सोडवली नाही तर उद्यापासून उचगावचा रस्ता बंद करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.








