- दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा
बेळगाव / प्रतिनिधी
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ८ ते १९ डिसेंबरदरम्यान बेळगावात होणार असून, १३ व १४ डिसेंबर हे दोन दिवस सुट्टीचे असतील. उर्वरित दहा दिवस विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू राहणार आहे. या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच माध्यम प्रतिनिधी मिळून सुमारे ८५०० जणांचा मुक्काम शहरात होणार आहे.
दिल्लीतील अलीकडील बॉम्बस्फोटाच्या घटनांचा विचार करता, या वर्षीच्या अधिवेशनासाठी अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी माहिती दिली.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विविध नियोजन समित्या स्थापन करण्यात आल्या असून त्या पूर्वतयारीला सुरुवात झाली आहे. चहापान, भोजन, निवास, वाहनव्यवस्था आदी सर्व बाबींचा खर्च मागील अधिवेशनाच्या तुलनेत यंदा १० ते २० टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मागील वर्षी अधिवेशनावर जवळपास १५.३० कोटी रुपये खर्च झाला होता. यंदाचा खर्च २० कोटी रुपयांच्या आसपास जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिवेशनाच्या काळात लॉज, रेस्टॉरंट आणि वसतिगृहांचे भाडे वाढण्याची परंपरा यंदाही कायम आहे.
• २०२१ मध्ये – १३.८५ कोटी , २०२२ मध्ये – १४.२० कोटी , २०२३ मध्ये – १६.५० कोटी , २०२४ मध्ये – १५.३० कोटी रुपये अशी मागील वर्षांची खर्चाची नोंद आहे. यावर्षी या तुलनेत ४ ते ५ कोटी रुपये अधिक खर्च अपेक्षित असल्याचे प्रशासनाने सांगितले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले की, राज्यभरातून येणाऱ्या ८५०० हून अधिक व्यक्तींच्या निवासाची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच, अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येणार आहेत.








