• उसाने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉली पेटविल्या : ५० ट्रॅक्टरसह अनेक दुचाकी भस्मसात

जमखंडी / वार्ताहर

मुधोळ येथे ऊस दराकरिता सुरू असलेले आंदोलन गुरुवारी सायंकाळी पेटले असून महालिंगपूर जवळील समीरवाडी (सैदापूर) येथील गोदावरी साखर कारखान्याच्या परिसरात उभ्या असलेल्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली पेटविण्यात आल्या. काही ट्रॉली उलटण्यात आल्या. यात ५० ट्रॅक्टर-ट्रॉलींसह अनेक दुचाकी भस्मसात झाल्याची दुर्घटना घडली. शेतकऱ्यांचा मोर्चा मुधोळहून समीरवाडी फॅक्टरीकडे जाताच पोलिसांनी त्यांना रोखले. दरम्यान पोलिसांवर काहींनी दगडफेक केल्याने त्यात पोलीस अधिकाऱ्यांसह काही पोलीस व शेतकरी जखमी झाले असल्याचे कळते.

बागलकोटचे जिल्हाधिकारी संगप्पा यांनी गुरुवार दि. १३ रोजी रात्री ८ पासून जमखंडी, मुधोळ, रबकवी बनहट्टी या तालुक्यांमध्ये जमावबंदी आदेश जारी केला असून यादरम्यान कोणताही मोर्चा, निदर्शने, सभा घेण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश दि. १६ रोजी सकाळी ८ पर्यंत लागू करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सदर घटनेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधून घेतली असून पालकमंत्री आर. बी. तिम्मापूर यांना बेंगळूरला बोलावले आहे. जिल्ह्यातील समीरवाडी येथील उसाने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलींना आग लावण्याची घटना अत्यंत दुःखद आहे, अशी प्रतिक्रिया बागलकोट जिल्हा पालकमंत्री आर.बी. तिम्मापूर यांनी व्यक्त केली.

सरकारने प्रतिटन उसाला ३३०० रुपये रिकव्हरी आधारे देण्याचे जाहीर केले होते. पण हा आदेश मुधोळ येथील शेतकऱ्यांनी मान्य न करता ३,५०० रुपये देण्याची मागणी करून गेल्या पाच दिवसांपासून मुधोळ येथे आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, जिल्हा प्रशासन आणि मंत्र्यांनी शेतकरी नेते व साखर कारखानदारांची बैठक घेऊन चर्चा केली होती. रिकव्हरी आधारे निश्चित करण्याऐवजी सरसकट ३,३०० रुपये द्यावेत व मागील वर्षातील बाकी देऊन कारखाने सुरू करावेत, अशी चर्चा झाली होती. याला सहमती दर्शविली होती. हा निर्णय सायंकाळी घेण्याकरिता मुधोळ येथील तहसील जिल्हा प्रशासन कार्यालयात अधिकारी व साखर कारखानदार उपस्थित होते. पण त्याअगोदर शेतकऱ्यांचा मोर्चा समीरवाडीकडे गेला आणि ही घटना घडली. आपण उत्पादन केलेल्या पिकांचे नुकसान शेतकरी करणार नाहीत. तरीही पोलीस याचा तपास करून कारवाई करतील, असे त्यांनी सांगितले.दरम्यान यात जिल्हा अतिरिक्त पोलीसप्रमुख जखमी झाले असून ही अत्यंत दुःखद घडली असल्याचे सांगून त्यांनी खेद व्यक्त केला. यांच्यात शेतकरी, कारखानदार सौहार्दपूर्ण वातावरण असावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

  • आंदोलन : 
  • शेतकऱ्यांचा मोर्चा समीरवाडीकडे जाताच पोलिसांनी रोखला
  • जमखंडी, मुधोळ, रबकवी- बनहट्टी तालुक्यात जमावबंदीचा आदेश
  • मोर्चा, निदर्शने, सभा घेण्यास मनाई
  • मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश :

बेंगळूर : सैदापूर येथे साखर कारखान्यासमोर ऊस भरलेल्या ट्रॅक्टर-टॉलींना आग लावण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी खेद व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मंत्री आर. बी. तिम्मापूर यांना फोन करून घटनेची माहिती घेतली. तसेच अधिकाऱ्यांशीही चर्चा करून माहिती घेतली.