• बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ अन् शोलेतील ‘वीरू’ काळाच्या पडद्याआड
  • मनोरंजन विश्वावर शोककळा

मुंबई : बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ आणि शोलेतील ‘वीरू’ अर्थात हिंदी चित्रपट विश्वातील जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. तब्बल सहा दशके बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्रकृती अस्वास्थामुळे धर्मेंद्र यांना सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. सुरुवातीला ते उपचारांना प्रतिसाद देत होते. पण नंतर त्यांची प्रकृती काहीशी नाजूक होती. त्यामुळे त्यांना आयसीयूमधून व्हेंटिलेटरवर शिफ्ट करण्यात आले होते. धर्मेंद्र उपचारांना प्रतिसाद देत, असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली होती. पण आज त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

१९८१ मध्ये, प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी चित्रपट उद्योगात आपले पाय अधिक मजबूत करण्यासाठी ‘विजयता फिल्म्स’ हे त्यांचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले. ‘विजयता फिल्म्स’च्या माध्यमातून, धर्मेंद्र यांनी सर्वात आधी त्यांची दोन्ही मुले, सनी देओल आणि बॉबी देओल यांना बॉलिवूडमध्ये आणले. यानंतर धर्मेंद्र यांनी त्यांच्या कुटुंबातील पुढच्या पिढीला चित्रपटांमध्ये संधी दिली, त्यांचा नातू करण देओल याची प्रेक्षकांना ओळख करून दिली.

  • तब्बल सहा दशके सिनेसृष्टीवर राज्य करणारा ‘ही-मॅन’ :

धर्मेंद्र यांनी आपल्या सहा दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘सत्यकाम’, ‘सीता और गीता’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केले. जरी त्यांनी जगाला अखेरचा अलविदा म्हटले असले , तरीसुद्धा ते आज, उद्या आणि कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतील.

  • सहा दशकांच्या चित्रपट कारकिर्दीत ३०० हून अधिक चित्रपट :

धर्मेंद्र यांनी त्यांच्या ६ दशकांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०१२ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. धर्मेंद्र यांनी १९६० मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘फूल और पत्थर’, ‘सीता और गीता’, ‘शोले’, ‘धरमवीर’, ‘आंखे’, ‘राजा जानी’,,” ‘गुलामी’, ‘प्रतिज्ञा’, ‘नये जमाना’, ‘ बर्निंग ट्रेन’ आणि ‘यादों की बारात’ यासह अनेक हिट चित्रपट दिले. या चित्रपटांनी त्यांना केवळ एक प्रमुख अभिनेता म्हणून स्थापित केलं नाही तर प्रेक्षकांवर कायमची छाप सोडली.