- निवडणुका तात्काळ घ्याव्यात ; जिल्हाधिकारी कार्यालयावर फुटबॉल क्लब्सची धडक
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेतील कथित आर्थिक अनियमितता आणि निवडणुका न घेण्याच्या विरोधात आज बेळगावमधील विविध फुटबॉल क्लब, फुटबॉलप्रेमी आणि खेळाडू यांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला.
शहरातील राणी चेन्नम्मा चौकातून निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचली आणि तेथे अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
चौगुले फुटबॉल क्लबचे सचिव प्रणय शेट्टी यांनी सांगितले की, बी.डी.एफ.ए. अध्यक्षांकडून संघटनेच्या निधीमध्ये गैरव्यवहार झाल्याची माहिती बाहेर आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य संघटनेने त्यांना निलंबित केल्याचे आणि जिल्हा संघटनेत पुनर्निवडणूक घेण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सचिवांनीही स्वतंत्रपणे निधी काढल्याचा आरोप करण्यात आला. तसेच, जिल्हा संघटनेच्या निर्देशांकडे दुर्लक्ष केल्यास निलंबनाची धमकी दिली जात असल्याचाही दावा करण्यात आला.
निषेध सभेत बोलताना माजी उपमहापौर आनंद चव्हाण यांनी बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेच्या अधिकार दुरुपयोगाबाबत राज्य संघटनेकडे औपचारिक तक्रार दाखल केल्याचे सांगितले. राज्य संघटनेने ५ जुलैपर्यंत जिल्हा संघटनेच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्वरित निवडणुका झाल्यास स्थानिक फुटबॉलपटूंना सामने व स्पर्धांचे आयोजन अधिक सुलभ होईल, तसेच त्यांना योग्य न्याय मिळेल, असे त्यांनी सांगितले.
आजच्या या आंदोलनात शेकडो फुटबॉलप्रेमी, खेळाडू आणि विविध क्लबचे सदस्य सहभागी झाले होते.








