बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि सार्वजनिक स्थळी अनेक वाहने दीर्घकाळापासून विनाशोध उभी असल्याचे समोर आले आहे. ही वाहने जागा व्यापत असून, वाहतुकीच्या प्रवाहात अडथळे निर्माण करत आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शहर पोलिसांनी आता विशेष मोहीम राबवण्याचे निश्चित केले आहे.
या उपक्रमाच्या अंतर्गत, रस्त्याच्या कडेला सोडून दिलेली किंवा अडथळा निर्माण करणारी सर्व वाहने टोईंग करून पोलिस ठाण्यात हलवली जाणार आहेत. त्यामुळे शहरातील मार्ग अधिक मोकळे आणि सुरक्षित होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
याचबरोबर पोलिसांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले असून, आपल्या परिसरात बेवारस अवस्थेत उभी राहिलेली कोणतीही वाहने दिसल्यास त्यांची छायाचित्रे घेऊन शहर पोलिसांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवर पाठवावीत, असे सांगितले आहे. नागरिकांच्या सूचनेवर तत्काळ कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.







