- महामार्गावर ठिय्या आंदोलन
निपाणी : बेळगाव सीमाभागात ‘काळा दिवस’ पाळणाऱ्या मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी हातकणंगलेचे खासदार आणि तज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने १ नोव्हेंबरला बेळगावकडे निघाले होते. मात्र, महाराष्ट्र–कर्नाटक सीमेजवळील कोगनोळी टोलनाक्यावर कर्नाटक पोलिसांनी त्यांना थांबवत प्रवेश नाकारला. यामुळे काही वेळ पुणे–बंगळूर महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली.

प्रवेश बंदीचा निर्णय कळताच खासदार माने यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत महामार्गावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. “मी लोकप्रतिनिधी असून, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करण्याचा माझा संवैधानिक अधिकार आहे. कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेला तो रोखण्याचा अधिकार नाही,” असे म्हणत त्यांनी कर्नाटक प्रशासनावर दडपशाहीचा आरोप केला. तसेच बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्याची घोषणाही त्यांनी केली. “मराठी भाषिकांचा न्यायासाठीचा संघर्ष सुरू राहणार,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, परिस्थिती बिघडू नये म्हणून कर्नाटक पोलिसांनी खासदार माने यांना ताब्यात घेऊन कागल पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणा देत निषेध नोंदवला.
या घडामोडींमुळे सीमाभागातील वातावरण पुन्हा तणावपूर्ण झाले असून, पुढील काही तासांत या प्रकरणावर राजकीय हालचाली वेग धरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








